सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, गटनेते चेतन नरोटे तसेच महापालिकेचे नगरसेवक सर्व सेलचे पदाधिकारी सर्व विभागाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाई गॅस इंधन दरवाढीच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली
काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नव्हती या आंदोलनात कोरोनाचे नियम डावलून सोशल डिस्टन्स न ठेवल्याने तसेच महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

















