सोलापूर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीची बैठक संपन्न झाली. यामध्ये आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांनी समांतर जलवाहिनीचे थांबवलेले कामावर नाराजी व्यक्त करीत तत्काळ काम सुरू करण्याच्या सूचना केल्या.
सोलापूर शहराला वाढीव पाणीपुरवठा योजना म्हणून उजनी धरणावरून समांतर जलवाहिनी करण्यात येत आहे. सुरुवातीला 250 कोटींची स्कीम होती त्याला उशीर झाल्याने आता ती योजना 639 कोटींवर गेली आहे.
आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत शहराला आता 5 दिवसाआड पाणीपुरवठा होतो, दररोज पाणी तर तेवढेच उचलले जाते, पण पाणी का दिले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी समांतर जाहीर वाहिनीची योजना कागदी घोडे चालवून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प मागे पडत गेलेला आहे गेल्या दोन-तीन वर्षापासून फक्त टेंडर प्रक्रिया व इतर गोष्टीची कारणे सांगून या प्रकल्पाचे काम थांबवलेले आहे. अशामुळे उजनी धरणामध्ये मुबलक पाणी असून देखील सोलापूरकरांना 5 ते 6 दिवसा आड पाणी मिळत आहे. काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैद्य कारण नसताना स्मार्ट सिटी च्या तत्कालीन सीइओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करा व हे कारण काम पूर्ण होण्याकरिता कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा अशी मागणी केली.
महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी हा दोष स्मार्ट सिटीच्या मागील सीईओ यांना दिला. यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूरच्या 2 टीएमसी साठी शहराला 22 टीएमसी जादा द्यावे लागते, उजनीत पाणी भरपूर आहे, डेड स्टॉक मध्ये ही 40 टीएमसी पाणी असते त्यामुळे काम तातडीने सुरू करा, काम व्यवस्थित न केलेल्या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या.



















