सोलापूर : शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी दुपारी प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची भेट घेतली. ज्यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, अंबादास करगुळे, श्री वाडेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठोंबरे यांच्याशी बराच वेळ चर्चा केल्यानंतर आमदार शिंदे यांची पत्रकारांनी भेट घेतली. या भेटी संदर्भात माहिती देताना शिंदे म्हणाल्या, सेतू सुविधा केंद्र बंद होऊन बरेच दिवस झाले त्यामुळे विविध दाखले हे महा-ई-सेवा केंद्र मधून मिळत आहेत परंतु ई सेवा केंद्र वाले नागरिकांची प्रचंड लोटमार करत आहेत. जिल्हा प्रशासन सेतू केंद्राचे टेंडर आज काढतो उद्या काढतो असे वारंवार सांगते पण अद्यापही टेंडर निघाले नाही. आता तर पुढील वर्षी शाळा सुरू होतील त्यासाठी अनेक दाखल्यांची गरज असते. चर्चा केल्यानंतर समजले की, लवकरच शिबिरे लावून दाखले दिले जातील असे प्रशासनाने सांगितले आहे.
तसेच निराधार नागरिकांना आता मानधनांमध्ये एक हजार रुपये वाढ झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना 21 हजार उत्पन्न दाखला देण्यास सांगितल्याने त्यांचे तारांबळ उडत आहे. एकतर उत्पन्न दाखला देण्याची सक्ती करू नये अन्यथा 21 हजार ऐवजी 51 हजाराचा उत्पन्न दाखला देण्याची अट घालावी अशी मागणी केल्याचे त्या म्हणाल्या.

















