सोलापूर : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी अकरा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल, ज्येष्ठ नेते अब्दुल गफार कादरी, मोईन सय्यद, अन्वर सादात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे.
दरम्यान खासदार ओवेसी हे सकाळी साडे दहा वाजता हैदराबाद वरून मोटारीने शासकीय विश्रामगृहात येतील त्यानंतर अकरा वाजता ते हुतात्मा स्मृती मंदिर कडे जातील, मेळाव्यानंतर दुपारचे जेवण ते मौलाली चौकातील नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या निवासस्थानी करतील, नंतर दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन ते हैदराबाद कडे रवाना होतील अशी माहिती अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या गर्दीचा विचार करता पोलिसांनी परवानगी दिली तरच नगरसेवक जहागीरदार यांच्या निवासस्थानी जातील अन्यथा शासकीय विश्रामगृहात ते जहागीरदार यांच्याकडे बनवलेले जेवण करतील.अशी माहिती आहे.

















