सोलापूर – काँग्रेसच्या निर्धार महाशिबीरात भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. निंबर्गी यांच्या प्रवेशाने काँग्रेसला शहर उत्तरमधील खमक्या आणि अभ्यासू नेता मिळाला आहे, भविष्यात उत्तरची जबाबदारी ही निश्चितच निंबर्गी सरांकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेस प्रवेशानंतर आपल्या भाषणात त्यांनी आपल्या भाजपमधील वाटचालीवर प्रकाश टाकला, स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा आदर्श घेवून आपण भाजपमध्ये काम केले मात्र आता भाजपात ती विचारधारा राहीली नाही, सोलापूरची भाजपही स्क्रिप्टेड असल्याचा आरोप केला. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी न घेता जोरदार टिका केली. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नगरसेवक असताना काँग्रेसच्या सत्तेतील माजी महापौर अलका राठोड आणि माजी महापौर सुशिला आबुटे यांना सळो की पळो करुन टाकले होते, असे सांगत त्यांनी या सभेत या दोन्ही माजी महिला महापौरांची जाहिर माफी मागितली. निंबर्गी असे म्हणताच एकमेकांच्या शेजारी बसलेल्या राठोड आणि आबुटे यांच्या चेहऱ्यावर हास्याची झालर दिसली.



















