सोलापूर : शासन निर्णय क्रमांक:- गौखनि- 10/1222/प्र.क्र.82/ख-1, दि. 19 एप्रिल 2023 नुसार राज्यातील नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी तसेच अवैध वाळु उत्खनन वाहतुकीस प्रतिबंध करणेकामी शासनामार्फत वाळु उत्खनन व विक्री याबाबतचे सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील वाफेगाव, उंबरे (वे), जांभूड, पंढरपूर तालुक्यातील चळे, मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण यापैकी माळशिरस तालुक्यातील उंबरे, जांभूड, व पंढरपूर तालुक्यातील चळे, या वाळू घाटाच्या ठिकाणी शासकीय वाळू डेपोच्या ठिकाणी वाळू विक्रीसाठी साठा केलेला असल्याने सदर वाळूघाटावरून वाळू नागरीकांना विक्रीसाठी खुली करण्यात आलेली आहे.
नागरिकांसाठी सदर वाळु शासकीय दराने रु.600/- प्रतिब्रास वाळू त्रिकीचा दर असेल याव्यतिरिक्त शासनामार्फत आकारण्यात येणारे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतुक परवाना सेवा शुल्क इ. खर्च तसेच वाळु वाहतुकीचा खर्च हा नागरिकांना करावा लागणार आहे.
ज्या ग्राहकांना वाळुची आवश्यकता आहे त्यांनी ऑनलाईन महाखनिज www.mahakhanij.maharashtra.gov.in या प्रणालीवर / वेबसाईटवर वाळू खरेदी मागणीची नोंद करणे आवश्यक राहील. सदर वेबसाईट वरती वाळू खरेदीची मागणी नोंदवताना, अर्जदार यांना यादीमध्ये समाविष्ट आहे त्यापैकी एक स्वतःचे ओळखपत्र वेबसाईट वरती अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदरची वाळू ही प्रतिब्रास 600 रुपये या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तथापि वाहतुकीचा खर्च हा मागणीदार यांना स्वतः सोसावयाचा आहे त्याकरिता परिवहन विभागाकडून तालुक्यातील वाहनांकरिता वाळू वाहतुकीचे दर निश्चित करण्यात आलेले असून, सदर महाखनिज प्रणाली वरती जी वाहने जीपीएस द्वारे नोंदणीकृत असतील, अशा वाहनातून सदरची वाळू ही वाळू डेपो पासून संबंधित मागणीदारांना त्यांच्या इच्छित असलेल्या स्थळापर्यंत आरटीओने निश्चित केलेल्या दराने वाहतूक करून घेऊन जाता शकेल.