सोलापूर : अक्कलकोट रोड एम आय डी सी भागात एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने युवकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असताना आणि सोलापूर महानगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्वीकरण करण्याचा निर्णय घेतला असताना सोलापूर शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांना जीवघेणा चावा घेतल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास जुनी मिल चाळ परिसरात घडली.
मंगळवारी सकाळच्या सुमारास दोन मुले खेळत असताना या भागातील भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या मुलांना कचराकुंडी जवळ ओढत नेऊन कुत्र्यांनी पोटाला, मांडीला, तोंडावर जोरदार चावा घेतला आहे. हा प्रकार नागरिकांना दिसतात त्यांनी तातडीने कुत्र्यांना हाकलून लावले. हे दोन्ही बालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल कडे नेण्यात आले आहे.
दरम्यान या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घटना अतिशय गंभीर असून महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या विषयावर उदासीन दिसून येते. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फोन केला असता आमच्याकडे मनुष्यबळ नाही, कुत्रे पकडण्यासाठी वाहने उपलब्ध नाही अशी कारणे सांगून वेळ मारून नेला जातो अशी तक्रार त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.