सोलापूर : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर खोपोली नजीक झालेल्या भीषण अपघातात जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष गौरव खरात यांच्यासह त्यांचे मित्र सौरभ तुळसे, सिद्धार्थ राजगुरू तसेच कदम नावाच्या एका युवकाचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की सर्व जण जागीच ठार झाले.
या अपघातानंतर सोलापुरातील बुद्ध नगर फॉरेस्ट या परिसरात शोककळा पसरली, यातील तीनही युवक एकाच गल्लीतील राहणारे असल्याने सर्वत्र स्मशान शांतता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. गौरव खरात यांच्या घरासमोर मित्र व नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत होते. त्यांचे वडील ऍड गौरव खरात यांनी माहिती दिली. काल मोहोळ तालुक्यातील बेगमपूर याठिकाणी गौरव कुस्ती स्पर्धा साठी गेला होता त्यानंतर तो वाटेत एका मित्राच्या हॉटेलवर जेवण करून साडेअकराच्या सुमारास घरी भेटायला आला. त्यानंतर सौरव तुळसे, सिद्धार्थ राजगुरू यांना घेऊन मुंबईला निघाला, सौरभ तूळसे याचा तुळजापूरचा नातेवाईक सोलापुरात आला होता तोही त्यांच्या सोबत निघाला वडील त्याला म्हणाले, बाळा रात्रीचा प्रवास नको, खूप उशीर झाला आहे, मात्र त्याने ऐकले नाही तो तसाच गेला. दर वेळेस तो पुण्यात मुक्काम करून सकाळच्या सुमारास मुंबईला निघत होता मात्र या वेळेस त्यांनी तसे न करता तो थेट मुंबईला निघाला आणि ही दुर्घटना घडली असे सांगताना वडीलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
गौरव खरात यांचा कार्यकर्ता अजिंक्य गायकवाड याचासुद्धा डोळ्यातून अश्रू वाहत होते… बॉसने मला कॅन्सल करून त्या तुळजापूरच्या मुलाला सोबत मुंबईला नेले, बॉस तुम्ही मला सोडून गेलात म्हणून त्याने हुंदका फोडला….,
बुद्ध नगर फॉरेस्ट भागांमध्ये एक गल्ली सोडून हे तिन्ही युवक राहत होते. प्रत्येकाच्या घरासमोर नातेवाईकांची गर्दी होती, महिलांना अश्रू अनावर झाले होते.
















