सोलापूर, दि. 15- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्यांच्या संपामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश (पेट-8) मौखिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून त्यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पेट-8- पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या विविध 36 विषयांच्या मौखिक परीक्षेचे आयोजन दि. 16 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये विद्यापीठात ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले होते. त्यासंदर्भाची संपूर्ण तयारी संशोधन विभागाच्यावतीने करण्यात आली होती.
16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 1300 उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षार्थी यासाठी हजर राहणार होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता उपस्थित राहण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएच. डी प्रवेशाची मौखिक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने घेण्यात आल्याचे प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी सांगितले.
आता सुधारित वेळापत्रकानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश मौखिक परीक्षा दि. 23 नोव्हेंबर 2021 पासून होणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित परीक्षार्थींनी मौखिक परीक्षेस हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
















