सोलापूर जिल्हा परिषदेने मार्च 2021 पूर्वी जलजीवन मिशन या योजनेतून ग्रामीण भागात दिलेले नळ जोडणीचे उद्दिष्ट अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले, 1 लाखाहून अधिक नळजोडण्या झाल्या, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतूक राज्यस्तरावर झाले, मिशन डायरेक्टर आर विमला यांनी एक वर्षाचे उद्दिष्ट केवळ चार महिन्यात पूर्ण झाल्याने जिथे इच्छा, तिथे मार्ग अशा शब्दांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कौतुक केले.
एकीकडे असे चांगले काम झालेले असताना सन 2021- 22 या वर्षात जिल्हा परिषदेला ग्रामीण भागात 75000 नळजोडणीचे उद्दिष्ट आहे, मात्र मार्च नंतर आता तीन महिने झाले जिल्ह्यात काहीही काम झालेले नाही याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेतली,
या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह पाणी व स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी मागील तीन महिन्यात झालेल्या कामाबद्दल तीव्र असा संताप व्यक्त केला जिल्हा परिषदेची नाचक्की व्हावी वाटते का? जिल्हा परिषदेची बदनामी व्हावी वाटते का? तसे सांगा अशा शब्दात यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले,
कंत्राटी कर्मचाऱ्यांना तर कामावरून कमी करण्याची तंबी दिली काम होत नसेल तर थेट घरी बसा असे सुनावत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली, माझ्या मनात आले तर शेलार यांचे काम थांबवून त्यांचा चार्ज एका अव्वल कारकूनला देईन असा सज्जड दम ही भरला.


















