सोलापूर दि.27 (जिमाका): शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आडे यांनी केले आहे.
सोलापूर महापालिकाक्षेत्रामध्ये तसेच महापालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी.परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय असून, भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी भोजन भत्ता 25 हजार, निवास भत्ता 12 हजार, निर्वाह भत्ता 6 हजार असा प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च 43 हजार रुपये इतकी रक्कम अनुज्ञेय आहे. तसे या रक्कमे व्यतीरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रुपये दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थ्यास कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसावा.शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता एसएससी, एचएसी, पदवी , पदविकामध्ये किमान 50 पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असून, गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
एचएससी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी,पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक राहील, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सोलापूर येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पात्र विद्यार्थी आपला अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे समक्ष सादर करावा. अधिक माहितीसाठी 0217-2734950 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहनही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आडे यांनी केले आहे. तसेच अपूर्ण व आवश्यक कागदपत्रे सादर न केलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.


















