सोलापूर जिल्ह्यात आषाढी वारीची लगबग सुरू आहे अनेक पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. शनिवार 24 जून रोजी रात्री अहमदनगर जिल्ह्यातील राहणार भातोडे इथले वारकरी सुभाष काशिनाथ पवार यांना रात्री अडीच वाजता करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी जवळ मायनर अटॅक आला. तेव्हा सोबत असलेले वारकरी शामराव घोलप यांनी तात्काळ सोलापूरचे पूर्वीचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि सध्याचे नगरचे कलेक्टर सिध्दाराम सालीमठ यांना फोन करून माहिती दिली.
सालीमठ यांनी तात्काळ अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना याबाबत कल्पना दिली. एवढ्या रात्री कुणाला संपर्क करायचा असा विचार करत त्यांनी लगेच करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक संजय आंबोले यांना रात्री तीन वाजता फोन करून पवार यांना तात्काळ सेवा मिळवून देणे बाबत सूचित केले. अंबोले यांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून पवार यांना मायनर अटॅक असल्याने आणि पीएसी जेऊर येथे कार्डिया डॉक्टर नसल्याने करमाळ्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कोळेकर यांच्याकडून करमाळ्याचे कार्डियाक डॉक्टर जावळेकर ना सूचित करून सुभाष पवार यांना तातडीने उपचाराबाबत विनंती केली.
डॉक्टर जावळेकर यांनी प्रसंगाचे भान ओळखून पवार यांना तात्काळ उपचार केले. त्यामुळे रविवार सकाळी पवार वारीत सामील झाले असल्याचे समजले. अशा वाईट प्रसंगात शामराव घोलप यांनी एवढ्या रात्री मदत मिळाली म्हणून अतिरिक्त कलेक्टर ठोंबरे, डॉक्टर जावळेकर करमाळा आणि आमदार संजयमामा यांचे स्वीय सहाय्यक आंबोले यांचे आभार मानले. नक्कीच सर्वांचा लाडका विठुराया वारीतील प्रत्येकाचीच कुणाच्या तर कुणाच्या रूपात काळजी घेतो याची प्रचिती आम्हाला आल्याचे घोलप यांनी आवर्जून सांगितले.


















