सोलापूर : राज्यामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप रविवार दिनांक 2 जुलै रोजी सर्वांना पाहायला मिळाला. अनेकांना हे खरं असं वाटलंच नाही. कारण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून आपल्या समर्थक आमदारांच्या संख्येसह सरकारमध्ये ते सामील झाले आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
रविवारचा दिवस होता, दुपारी दोन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही एकच चर्चा ऐकण्यास मिळाली. अनेकांनी यावर जोरदार अशी टीका केली आहे. नक्की विश्वास कोणावर ठेवायचा? ही कसली राजनीति? काय चालले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? असे अनेक प्रश्न लोक आता एकमेकांना विचारू लागले आहेत.
एकीकडे राज्यांमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यातील हा दुसरा मोठा पाऊस झाला. 24 जुन रोजी सोलापूर शहर जिल्ह्यात पावसाळ्यातील पहिला मोठा पाऊस झाला होता. त्यानंतर बरोबर दहा दिवसानंतर रविवारी सायंकाळी सातच्या नंतर शहरांमध्ये मोठा पाऊस झाला तर जिल्ह्याच्या काही भागात सायंकाळी चार नंतर पावसाला सुरुवात झाली. साडेसातच्या सुमारास मात्र पावसाने जोर धरला.
सोलापूर तुळजापूर रोडवर हगलूर, उळे, तामलवाडी, सुरतगाव या भागात मात्र जोरदार सरी कोसळल्या. सुरतगाव मध्ये तर साडेतीनला सुरू झालेला पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता सुमारे एक तास अतिशय मुसळधार असा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत महिनाभरात दुसरा पाऊस झाल्याने आता खरीप पेरण्याला वेग येणार असल्याचे चित्र दिसून येईल.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच त्याच दिवशी दुपारनंतर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. हा नक्की योगायोग म्हणावा की अजित पवार यांचा पायगुण अशी ही मजेदार चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे..

















