सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे व नातू जयदीप साठे यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे काका साठे यांचे चिरंजीव आता अजित पवारांच्या गटात गेल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उत आला आहे.
दरम्यान जितेंद्र साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत. त्याला निधी मोठ्या प्रमाणात लागणार आहे. शिरापूर उपसा सिंचन योजना, जिल्हा उप रुग्णालय, तालुकास्तरीय क्रीडा संकुल तसेच तालुक्यातील रस्ते आणि गावांतर्गत रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी आम्ही अजित पवार यांची भेट घेतली आहे. दादांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. सर्वच प्रलंबित असलेल्या कामांना निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. काका साठे यांची परवानगी घेतली का? असा प्रश्न केला असता अजून त्यांच्याशी चर्चा झालेली नाही, हा आमचा निर्णय आहे परंतु तालुक्याच्या विकासासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे साठे यांनी सांगितले.