आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रतिष्ठेची मांडली जात असलेली आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासाठी अस्तित्वाची लढत असलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अक्कलकोटमध्ये शुक्रवारी मतदान पार पडले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाने चांगलीच रंगत आणली होती. स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनल विरुद्ध स्वामी समर्थ शेतकरी परिवर्तन पॅनल अशी लढत पाहायला मिळाली.
माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, इकडे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार झाला. निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य या मतदारांचा समावेश आहे. दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्रांवरील नेते मंडळी ठाण मांडून होती. वागदरी, तडवळ, जेऊर आणि चपळगाव अशा तीन ठिकाणी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्रे आहेत. दुपारपर्यंत अत्यंत चुरशीने 50% च्या वर मतदान झाले आहे.
दरम्यान या निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारराजा सत्ताधाऱ्यांनाच कौल देईल असा आशावाद माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील यांनी व्यक्त केला.
तर इकडे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे व माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी परिवर्तन अटळ असून सत्ता ताब्यात येईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट बाजार समितीची निवडणूक ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एखादी जिंकेल असा दावा करताना दुधनी बाजार समितीच्या निवडणूकीत ही भाजप विजय होईल असा आशावाद व्यक्त केला.
सर्वच मतदान केंद्राबाहेर दोन्ही समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. माजी उपसभापती रामचंद्र अरवत, अण्णाराव याबाजी, निलापा विजापुरे, सुरेश जळकी, शिवायोगी स्वामी, भीमाशंकर विजापुरे, शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यासह प्रतिष्ठित नेते मंडळी मतदान केंद्रात ठाण मांडून होते.
दरम्यान विशेष म्हणजे सुलेरजवळगे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी गळ्यात शेले घालून मतदानाचा हक्क बजावला. तडवळ बूथ केंद्रावर या मतदारांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते.




















