सोलापुरातील नागरी समस्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी, हितासाठी सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने भाजप सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चार पुतळा येथून महानगरपालिकेपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश हलगीनांद मोर्चा निघणार असून यामध्ये हजारोंच्या संख्येने युवक सहभागी होणार असल्याची माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांपूर्वी सोलापूर शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या खोट्या आश्वासनावर बळी पडून महापालिका सत्ता दिली. तसेच राज्यात, केंद्रात, सुद्धा भाजपची सत्ता आहे.पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला. रोज शहराला पाणीपुरवठा करतो म्हणून आश्वासन दिलेल्या भाजपने प्रत्यक्षात मात्र सात ते आठ दिवसात पाणीपुरवठा अपुरा, गडूळ, कमी दाबाने पाणीपुरवठा करत आहेत. दिवाबत्तीची सोय नाही. रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. यामुळे अनेकांचे अपघात होऊन बळी व कायम अपंग झाले आहेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. महापालिका दवाखान्यात औषधांची सोय नाही. परिवहन व्यवस्थेचे वाट लावले व महापालिका शाळांची दुरावस्था केली. स्वच्छतागृहांची वाट लावली. शहरात मध्य भागात शौचालय बंद पडले. नागरिकांची महिलांची मोठी गैरसोय होत आहेत. नळ कनेक्शन असताना सुद्धा पाणीपट्टी वसुली केली जात आहे.
सार्वजनिक नळ बंद करून गोरगरीब झोपडपट्टी भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून त्यांचे हाल केले जात आहेत. हद्दवाढ भागातील रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज, पाणी व्यवस्था आतापर्यंत करत आली नाही या मूलभूत सुविधा देऊन शकले नाहीत.सोलापुरात वाहतूक व्यवस्था कोलमडली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी 54 मीटर बायपास रस्ता महापालिकेच्या अनगोंदी कारभारामुळे रस्ता पूर्ण करता आले नाही महापालिकेतील विविध खात्यातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे प्रशासनाचा मनमानी कारभारामुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवता आले नाही. महापालिकेच्या निवडणुका दीड वर्षापासून घेतले नाही प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही. अशा सर्व समस्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापुरे, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, सुनील सारंगी, सरफराज शेख आदी उपस्थित होते.