सोलापूर, दि. 18(जिमाका) : – ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वार्ड मधील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्रीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी या यात्रेचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यातील पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे. एकही पात्र लाभार्थी केंद्राच्या योजना पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागाने नियोजन केले पाहिजे. या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा करू नये, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केंद्रीय योजनांची माहिती विशेष ग्रामसभा घेऊन देण्यात यावी तसेच ज्या केंद्रीय योजनांसाठी संबंधित लाभार्थ्यांचा हिस्सा आवश्यक असेल, त्याबाबत त्या लाभार्थ्यांना ग्रामसभेच्या माध्यमातून व्यवस्थित मार्गदर्शन करावे व लाभार्थ्याचा हिस्सा भरून घेऊन त्यांना संबंधित केंद्रीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच केंद्रीय योजनांची जनजागृती प्रत्येक गावात होण्यासाठी जे पाच चित्ररथ मिळणार आहेत त्याबाबत ते प्रत्येक गावात जातील यासाठी योग्य नियोजन करावे व या चित्रारथाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून आलेले विविध संदेश व योजनांच्या माहीतीचे प्रसारण त्या त्या गावात चांगल्या पद्धतीने होईल यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले.
या संकल्प यात्रेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरावर सर्व विभाग प्रमुखांची समिती गठीत करण्यात येणार असून तालुकास्तर, महापालिका, नगरपालिका तसेच ग्राम स्तरावर ही अशाच पद्धतीने समित्या तयार करून जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
प्रारंभी विकसित भारत संकल्प यात्रेचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत पाटील यांनी या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाची तसेच प्रत्येक विभागाची कोण कोणती जबाबदारी आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन पीपीटीद्वारे केले. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात हा उपक्रम नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊन तो 26 जानेवारी 2024 पर्यंत राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यातील पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ संबंधित विभागाच्या वतीने देऊन त्याचा दैनंदिन अहवाल दिलेल्या संकेतस्थळावर रोजच्या रोज अपलोड करावा अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.
0000000