सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समितीची सभा तब्बल सात महिन्यानंतर गुरुवारी घेण्यात आली. नियोजन समितीची बैठक म्हटले की विकास निधी खर्चाला मान्यता देण्यात येते. विकासाचे अनेक विषय चर्चिले जातात, अनेक प्रश्न सुटतात, त्यासाठी या समितीला महत्व आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या पावसाअभावी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तब्बल दोन तास टंचाईवर चर्चा करण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते परंतु या दोन तासात त्यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही, चिडीचूप असे चित्र होते. म्हणे त्यांचा गुरुवारी मौनव्रत असतो.
अडीच वाजता उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सभागृहात आगमन झाले परंतु पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निंबाळकर येतात पाच मिनिटांनी नियोजन समितीची बैठक एक तासासाठी तहकूब करत ते जेवायला निघून गेले अडीच वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत ओमराजे निंबाळकर सभागृहात बसून होते. ते उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात बार्शी हा तालुका येतो.
सोलापूरच्या काही आमदारांनी तर बैठकीला हजेरी ही लावली नाही केवळ एक तालुका असतानाही ओमराजे निंबाळकर आवर्जून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावतात. साडेतीन वाजता नियोजन समितीची सभा सुरू होताच त्यांनी आपले विषय धडाधड मांडण्यास सुरुवात केली.
बार्शी तालुक्यात पाऊस कमी असतानाही दोन मंडळ वगळले कसे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी सुरुवातीला यावर चर्चा झालेली आहे, उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फळबागा अनुदान मिळाले नसल्याचा मुद्दा मांडला तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये वाहून गेलेल्या जनावरांची नुकसान भरपाई अद्याप मिळाले नसल्याची मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर सोलापूरच्या विमानसेवेबाबतही प्रश्न उपस्थित केला. जनावरांच्या लंपी आजाराबाबत उपाय योजना संदर्भात आयोजित बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली. दोन खासदारांमधील फरक सभागृहातच दिसून आला. खासदार ओमराजे यांच्या पोटतिडकीवर पत्रकारांमध्ये ही चर्चा झाली.