सोलापूर : सासरच्या मंडळींनी पत्नीस नांदविण्याच्या घरगुती कारणावरुन लाथाबुक्याने मारहाण, दमदाटी करुन आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याने राजेश हणमंतु भिमरथी (वय-३५ वर्षे) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना हैदराबाद रस्त्यावरील जुना विडी घरकुल, तुळशांती नगरात शनिवारी, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीसह ०७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हैदराबाद रस्त्यावरील जुना विडी घरकुल, तूळशांती नगरातील रहिवासी
राजेश भिमरथी आणि त्याची पत्नी नंदिनी भिमरथी यांच्यात नेहमीच तक्रार-वादविवाद होऊन नेहमीच कौटुंबिक खटके उडत होते. त्याच कंटाळून सौ. नंदिनी तिचा एक मुलगा आणि मुलीसह राजेशपासून वेगळे राहत होते.
त्यातूनच सौ नंदिनीची माहेरची मंडळी, राजेश भीमरथी याला तिला नांदविण्याच्या कारणावरून नेहमीच वादविवाद, तक्रारी करून त्याच्यावर दबाव टाकीत होते. नेहमीचा वाद, सततच्या तक्रारी आणि वारंवार मिळणाऱ्या धमक्याला तो पुरता कंटाळला होता. त्यास कंटाळून राजेशने पूर्व भागात अंगणात सडा मारण्यासाठी सर्रासपणे वापरले जाणारे रासायनिक पिवळ्या रंगाचे विषारी द्रव्य प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा मार्ग पत्करला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्यास आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन विषारी पिवळे द्रव्य प्यायला भाग पाडून, त्याच्या मृत्युस कारणीभुत झाले असल्याची फिर्याद मृताचा भाऊ नागेश हणमंतु भिमरथी ( रा. प्लॉट नं. ११५, तुळशांती नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर, सध्या – प्लॉट नं. १५३ बी जे आर नगर, जवाहर नगर, सिकंदराबाद) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार मृताची पत्नी नंदिनी भिमरथी, हिरेष चंचाल, श्रीकांत चंचाल, करप्पा गुणगी, कासुबाई गुणगी, गोविंदप्पा चंचाल, भिमण्णा कुरुड यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.