सोलापूर : रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात संविधान बचाव यात्रा सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना खंबाळकर म्हणाले, देशातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या मनुवादी भूमिकेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान सध्या धोक्यात आहे. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद व विद्यमान राष्ट्रपती श्रीमती मुर्मु या सर्वोच्च पदातील व्यक्तींना सुद्धा भाजपने हीन वागणूक दिली आहे यावरून भारतीय जनता पार्टी संविधान विरोधीच असल्याचे स्पष्ट होते.
आगामी लोकसभा निवडणूक रिपब्लिकन सेना पूर्ण ताकतीने लढवणार असून भारतीय जनता पार्टीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती खंबाळकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन शिंदे, प्रदेश प्रवक्ते वसंत कांबळे, प्रदेश सचिव श्रीपती ढोले, उपाध्यक्ष खाजाभाई पटेल, मुजिद पठाण, जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे, अतिश बनसोडे उपस्थित होते.