सोलापूर : मजरेवाडी भागातील शशिकला नगर इथल्या राजरत्न मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देऊन त्या भागातील अतिशय दुरावस्था झालेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू वाघमारे सचिव पांडुरंग सुरते, सामाजिक कार्यकर्ते मकबूल मुल्ला यांची उपस्थिती होती.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आमचा हा भाग सोलापूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ४ च्या हद्दीत येतो. या भागातील वरील नमुद केलेल्या रस्त्याची अवस्था ही अत्यंत गंभीर आहे. कुमठा नाका मार्कडेय नगर पासून पुढे केंगनाळकर शाळेपर्यंतचा रस्ता ड्रेनेज कामासाठी खोदून अर्धवट स्थितीत ठेवलेला आहे. तसेच पुढे केंगनाळकर शाळेपासून ताई चौकापर्यंतचा रस्ता सुध्दा ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर बुजवून डांबरीकरण केलेले आहे, पण ते काम अत्यंत निकृष्ट झालेले आहे. सध्या त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पुढे ताई चौक ते शांतीनगरकडे जाणारा रस्ता अत्यंत जीवघेणा ठरत आहे.
याबाबत आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेच्या सर्वच खातेप्रमुखांना लेखी निवेदन दिलेले आहे. त्यापैकी ताई चौक ते बनशंकरी हॉटेल, निलम नगर व शांती नगर ते ठाकरे कारखाना इथपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. परंतु याच मार्गावरील ताई चौक ते नवनाथ दत्त मंदिर पर्यतच्या रस्त्याची अवस्था ही अत्यंत धोकादायक झालेली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर नवनाथ दत्त मंदिर या ठिकाणी रस्त्यावर ४ फुटापर्यंत पावसाचे पाणी वाहत असते. आमच्या संस्थेच्या वतीने याबाबत अगोदर निवेदन दिलेले असताना, महापालिकेच्या संबंधीत अधिकान्यांनी आम्हाला सदरचा रस्ता मंजूर आहे, असे पत्र आम्हाला दिलेले आहे. त्याला आता तीन महिने पूर्ण होत आहेत. पण रस्त्याच्या कामाला काही सुरुवात झालेली नाही. जर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास येत्या 18 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.