अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नेते, 85 वर्षीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष केला.
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं निर्विवाद आणि एक हाती सत्ता प्राप्त केल्यानंतर सर्वांचचं लक्ष हे अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीकडं लागून राहिलं होतं.
सभापती तसचं उपसभापती निवडीसाठी सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं निवडणूक निर्णय अधिकारी अमर झालटे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सभापती पदासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं. सभापतीपदी दुसऱ्यांदा निवडून आले. यापुर्वी ते 1982 ते 1987 दरम्यान सभापती होते. उपसभापती पदासाठी अप्पासाहेब पाटील आणि कार्तिक पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यासाठी गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यात अप्पासाहेब पाटील यांना 12 तर कार्तिक पाटील यांना 6 मत पडल्यानं उपसभापतीपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड घोषित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष करत फटाक्यांची मुक्त आतषबाजी केली.
या निवडी नंतर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील तसचं उपसभापती अप्पासाहेब पाटील यांचा सर्व नूतन संचालक तसचं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील सत्कार करुन निवडी निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख सोपान निकते, अक्कलकोटचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपा नेते महेश हिंडोळे, श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन संजीवकुमार पाटील, यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आप्पांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना खऱ्याअर्थानं निश्चितचं बाजार समितीच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि त्यांचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ही ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करताना, अक्कलकोट आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होईल, शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास निश्चितचं सार्थ करुन दाखवू अशी ग्वाही दिली.
नूतन सभापती सिद्रामप्पा पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानताना गोल्डन गँगचे मनसुबे, त्यांचे कुटील डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडले. आगामी काळात देखील शेतकऱ्यांनी अशीचं साथ द्यावी असं आवाहन करत, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वशैलीचं त्यांनी मनापासून कौतुक केलं.
सुलेर जवळगे विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी चेअरमन रविकांत बगले यांच्यासह संचालका मंडळाकडून विशेष सत्कार घडून आणला. याप्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे संचालक बसवराज बाके, नागया स्वामी, व्हन्नप्पा बिराजदार, राजकुमार बगले, पिरोजी शिंगाडे, मल्लिकार्जुन अष्टगे, माजी उपसरपंच श्रीमंत बगले, भरत देवकते, माजी चेअरमन सिद्धाराम बाके, निलेश बाके, संतोष बगले, गंगाधर बाके, नागनाथ राजुरे आदींची उपस्थिती होती. ऋणानुबंध आणि निष्ठा आप्पांच्या बाबतीत नेहमीच सदैव तत्पर राहील अशी भावना चेअरमन रविकांत बगले यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी, उपसभापती सिध्दाराम बाके, अक्कलकोट तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष मोतीराम राठोड, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, श्री. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्या व्हाईस चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी, संचालक भरमनाथ भुताळी घोडके, तसचं महेश पाटील, दिलीप शावरी, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, तसचं करजगी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन विवेकानंद उंबरजे, श्री. स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक अशोक मुलगे तसचं विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सूत्रसंचालन मल्लिनाथ दुलंगे यांनी केलं.
.jpg)


















