सोलापूर, दिनांक 29(जिमाका):- मौजे औज तालुका दक्षिण सोलापूर येथील गावातील प्राथमिक शाळेच्या कंपाउंडवर चेट्टीनाड कंपनीचे सिमेंटचा टँकर (बलकर) उलटल्याने झालेल्या अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना माननीय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्राप्त प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसाह्य रक्कम तसेच कंपनीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात आले. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई देण्यात आली.
दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता होटगी रोडवर औज पोस्ट आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे सिमेंट कारखान्याचा बलकर अंगणवाडी शाळेच्या कंपाउंडवर पलटी झाला. या दुर्घटनेमध्ये विठ्ठल कोंडीबा शिंगाडे, शशिकांत इंगळे, अनिल नामदेव चौधरी तसेच प्रज्ञा बसवराज तोडतले या विद्यार्थ्यांनीसह एकूण चार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या.
या मयत व्यक्तींच्या वारसांना माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे आर्थिक मदत तसेच माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार चेट्टीनाड कंपनीकडून मयत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत यावेळी देण्यात आली. तसेच या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन महिलांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.
यावेळी झालेल्या आढावा बैठकीत मयताचे कुटुंबातील वारसांना कंपनीत नोकरी देण्याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कंपनीचे प्रतिनिधी तसेच ट्रान्सपोर्ट कंपनीचे प्रतिनिधी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच अपघातामुळे पडलेल्या जिल्हा परिषद शाळेची स्वागत कमान आणि ग्रामपंचायत कार्यालयाची खोली तातडीने बांधून देणे बाबत कंपनीला सूचना केली. याशिवाय औज गावातून होणारी जड वाहतूक इतर मार्गाने वळवण्यासाठी प्रस्तावित बायपास रस्त्याचे कामाविषयी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्याचे सूचित केले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सोलापूर उपविभाग क्रमांक 2 चे उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय गावडे, तहसिलदार किरण जमदाडे, पोलीस अधिकारी, चेट्टीनाड कंपनीचे तसेच वाहतूक कंपनीचे प्रतिनिधी , सरपंच, औज गावातील नागरिक उपस्थित होते.