सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रहिवासी असलेल्या खाजगी अनुदानित शाळेत शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिपाई पदासाठी शालार्थ आयडी न देता शिक्षण सेवक म्हणून शालार्थ आयडी दिल्याने त्या शिपायाचा पगार संस्थेने केला नाही.
परंतु या प्रकरणात नेमकी चूक संबंधित शिक्षण संस्था, प्राथमिक शिक्षण विभाग की शिक्षण उपसंचालक पुणे यांची आहे हे मात्र अजूनही समोर आलेले नाही. मयत हनुमंत काळे हे चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.
दरम्यान आत्महत्या केलेल्या हनुमंत काळे यांच्या कुटुंबीयांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली यावेळी त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली. आमचा मुलगा जेव्हापासून नोकरी करत होता तेव्हापासूनच्या पगारीचा मोबदला सून आणि मुलांच्या नावे द्यावा, या घटने जबाबदार सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी केली. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका विठ्ठल काळे यांनी घेतली आहे.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर बोलून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल त्यासाठी मी स्वतः राज्याच्या शिक्षण मंत्र्यांशी बोलेन अशी ग्वाही दिली आहे.