‘विवेक’ पुन्हा झेडपीत कधीच दिसणार नाही ; लिंगराज यांची ही इच्छा राहिली अपुरी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक नाव कायमच प्रत्येकांच्या स्मरणात राहणार आहे ते म्हणजे शनिवारी अपघातात दुर्दैवी निधन झालेले विवेक लिंगराज हे.
जिल्हा परिषदेमध्ये कोणताही कार्यक्रम असेल सर्वात पुढाकार घेणाऱ्या कर्मचारी, जिल्हा परिषदेमध्ये आत आल्यानंतर परिसरात जी झाडी दिसते ती लावण्यात लिंगराज यांनाच श्रेय जाते. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर, अडीअडचणीवर प्रशासनाशी आणि वेळप्रसंगी सरकारशी भांडणारा कामगार नेता, प्रसार माध्यमांचा चांगला मित्र, सर्वच अधिकाऱ्यांच्या आवडता कर्मचारी अशी ओळख सोडून लिंगराज हे आता गेले आहेत. ते आता जिल्हा परिषदेमध्ये कधीच दिसणार नाहीत याचे सर्वांनाच वाईट वाटते.
वाढदिवस अधिकाऱ्यांचा असो कर्मचाऱ्यांचा असो की पत्रकारांचा. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करून त्यांना एक रोपट लिंगराज हे नक्की देणार. त्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेमध्ये झाड बाबा म्हणून सुद्धा ओळख निर्माण झाली होती.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात घुसून काही लोकांनी धुडगूस घातला. त्यावेळी सर्वात प्रथम पुढाकार घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्र करून निषेध करणारा हा विवेक लिंगराज होता.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे पद होते. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या अडी अडचणीसाठी त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक ही कायम आपल्या ताब्यात ठेवली. त्या माध्यमातून गरजू कर्मचाऱ्यांना मोठी मदत होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांमध्ये कायमच जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्या निवडणुकीवरून राजकारण पाहायला मिळते. त्या निवडणुकीपुरतेच लिंगराज हे राजकारण करत असे परंतु इतर वेळी ते कर्मचारी संघटना यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत. कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात अडीअडचणी मध्ये सर्वात प्रथम धावून जाणारा म्हणून लिंगराज यांची ओळख होती.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अतिशय जवळचे कर्मचारी म्हणून लिंगराज यांची ओळख होती. स्वामी सरांसाठी ते छोट्या भावासारखे होते. दिलीप स्वामी यांची बदली झाल्यानंतर त्यांना काही महिन्यांनी जिल्हाधिकारी पदाची पोस्टिंग मिळाली. पण जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा सत्कार आणि निरोप समारंभ झाला नाही. आपल्या स्वामी साहेबांचा जिल्हा परिषदेच्या नूतन सभागृहात संघटना किंवा पतसंस्थेच्या एका दिमागदार कार्यक्रमात सत्कार करण्याची इच्छा विवेक लिंगराज यांची होती. ती इच्छा त्यांची अपुरी राहिले आहे.