मोहिते पाटील माढयात भाजपच्या विरोधात जाण्याची डेअरींग करणार का? कार्यकर्ते तर असे बोलू लागले
सोलापूर : भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुनश्च खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील गट प्रचंड नाराज झाला आहे. मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमधून बंडाचे निशाण फडकले जाण्याची शक्यता असून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाण्याची डेरिंग ‘मोहिते पाटील’ करतील का? असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
धैर्यशिल मोहिते पाटील हे यंदा माढा लोकसभा भारतीय जनता पार्टी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मागील दोन वर्षापासून त्या पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी तयारी केली होती आणि निश्चित ही उमेदवारी धैर्यशील भैय्यांनाच मिळेल असा विश्वास मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना होता. त्यासाठी खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी राज्य आणि केंद्रस्तरावर प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. परंतु करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माढयाचे आमदार बबनराव शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, माळशिरस आमदार खुद्द राम सातपुते हे सर्व रणजीतसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याने भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
संजय मामांच्या फार्म हाऊसवर रणजीतसिंह निंबाळकर यांच्या साठी नेते एकवटले
परंतु आता मोहिते पाटील गट प्रचंड संतापला आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ अशा भूमिकेत असून रविवारी शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, शेकापचे आमदार जयंतराव पाटील, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, करमाळ्याचे नारायण पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
एकूणच वातावरण पाहून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना त्या ठिकाणी यावे लागले. त्यांनी सर्व नेत्यांची समजूत काढली. मोहिते पाटील गटाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोधी दिसून आला. त्यांची उमेदवारी बदलण्याची मागणी करण्यात आली. तो मेसेज घेऊन महाजन हे मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर हे जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारानी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासाठी काम केले, 1लाख 13 हजाराचे मताधिक्य दिले, निवडून आणले परंतु निंबाळकर यांनी आम्हाला सोडून आमच्या विरोधकांसोबत ते जाऊन मिळाले आहेत म्हणून त्यांना आमचा विरोध आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे खासदारकीसाठी सक्षम असून आजपर्यंत आम्ही त्यांचे ऐकले आहे परंतु आता त्यांना कार्यकर्त्याच्या ऐकावे लागणार आहे, हीच वेळ आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.