सुशीलकुमार शिंदे यांचे उपकार माना ; नाहीतर तुमची कधीच पक्षातून हकालपट्टी झाली असती
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी पक्षात होत असलेली घुसमट आणि काँग्रेसने ते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर राजीनामा पत्रातून बरेच आरोप केले आहेत.
दरम्यान यावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांना पत्र काढून उत्तर दिले आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला. धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले. वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवडयापूर्वीच कळाले होते. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे ते जातात. त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिंदे यांनी सन्मानाने जिल्हा अध्यक्ष केले. त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले. पद घेताना नेत्यांचे दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायचे ही कुठली पद्धत आहे?
अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेस भवन मध्ये आले. काय काम केले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. गेले एक वर्षे काँग्रेस भवन कडे साधे फिरकले सुद्धा नाही आणि कामाची भाषा बोलतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उघडपणे काम करत भाजपला मदत केले होते. तसेच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम सातपुते यांचे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदावाराच्या विरोधात प्रचार केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या व काँग्रेसच्या अनेकांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती.
ते सांगतात की माझ्या अडचणीच्या वेळी कोणीच मदत केली नाही. पण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांनी स्वतः त्यांचे मातोश्री पदमजादेवी मोहिते पाटील यांच्याशी संपर्क करून कोणतेही अडचण असेल तर सांगा आम्ही सोबत आहोत असा धीर दिला होता. तसेच अकलूज येथे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम ठेवला होता त्याही वेळीही स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क करून भेटायला येतो असे म्हणाले असता आम्ही सर्वजण पुण्यात आहोत असा निरोप मिळाला. कदाचित मोहिते पाटील परिवाराने सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार आयोजित केला हे त्यांना आवडले नसावे.
धवलसिंह मोहिते पाटील हे विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. पण महाविकास आघाडी कडून शिवसेनेने आधीच उमेदवारी जाहीर केली होती. मग त्यांचा उमेदवारीचा विषय कुठे येतो. याचाही त्यांना राग असावा.
तसेच त्यांनी माझ्यावर हि टीका केली. माझ्या प्रभागात लोकसभा निवडणुकीत लीड नाही म्हणून खोटे बोलले. वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रभागात प्रणितीताई शिंदे यांना ९४४१ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना ७४८६ मते मिळाली. १९५५ मताची लीड प्रणितीताई शिंदे यांना माझ्या प्रभागातून मिळाली आहे. पक्षाचा आदेश म्हणून विधानसभा निवडणूक लढवलो. निवडणुकीत हार जीत होत असते. यापुढे ही पक्षासाठी लढत राहू.
काही लोक काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करत असतात त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा.