सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार आला या पवारांकडे ; लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींचा निर्णय
सोलापूर : सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवनसिंह मोहिते पाटील हे एका गंभीर गुन्ह्यांमध्ये अडचणीत आल्याने ते सध्या भूमिगत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षांच्या बैठका, वरिष्ठ नेत्यांचे दौरे याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे पक्षाने काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षांपैकी एकाकडे तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. याबाबत माध्यमांमधून बातम्या ही छापून आल्या.
ही लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर राखीव लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरत्या स्वरूपातील पदभार नव्याने कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार यांच्याकडे सोपवला आहे.
सोमवारी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत नूतन कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी जिल्हाध्यक्षांच्या केबिनमध्ये पदभार स्वीकारला शिंदे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पवार यांनी मंगळवार पासून आपल्या कामाला सुरुवात केल्याचे समजले. आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यात सुद्धा नंदकुमार पवार हे आवर्जून उपस्थित असतात.