सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, नमाज सोबत आता शिक्षण ही द्या, या वस्तू बॉयकॉट करा
सोलापूर : महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर गुरुवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोड वरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली.
काल बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते. ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजसाठी एकत्र आले होते आलमगीर ईदगाह (होटगी रोड) या ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी, मुस्लिम समाजाच्या मशीदीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला पाहिजे, मशीद म्हटले की त्यावरील भोंगा दिसतो परंतु या मशिदीत असलेल्या रिकाम्या जागेत आपल्या भागातील मुलांना शिक्षण द्या, रिटायर्ड टीचर, बेरोजगार युवकांना शिक्षण देण्याचे काम द्या त्यामुळे मशिदीतून आता केवळ नमाज नाही तर चांगले इंग्रजी, विज्ञान शिकून वैज्ञानिक, इंजिनियर, डॉक्टर मुले बाहेर पडतील असे आवाहन शहर काझी यांनी केले.
इस्राईल कडून पॅलेस्टीनीवर होत असलेल्या हल्ल्याचा यावेळी शहर काझी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आज जगातील मुसलमान सीमा भागात विखुरला गेला आहे. त्यामुळेच असे इस्राईल आणि अमेरिका हे असे देश अन्याय करत आहेत. त्यामुळे आपसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आता एकच पर्याय तो म्हणजे इस्राईल आणि अमेरिकेच्या वस्तूंना बायकॉट करा, त्या देशाच्या वस्तू वापरू नका, आपल्या देशातील वस्तू वापरून आपली अर्थव्यवस्था मजबूत करा असे आवाहनही शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी केले.