राम सातपुते यांनी घेतली राजन पाटलांची भेट ; शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भेटीपासून दूरच
सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे सोलापुरात स्वागत झाले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी काशी पिठाचे जगद्गुरु डॉक्टर शिवाचार्य यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्या कार्यालयाला भेट दिली. भाजपा आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
दुपारी उमेदवार राम सातपुते हे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी तसेच शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासोबत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी पाटील परिवारांनी सातपुते यांचे स्वागत केले. यापूर्वी सोलापुरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात राजन पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांपैकी एक मत मोहोळ मतदारसंघ जास्त देईल अशी घोषणा केली होती.
दरम्यान सोलापुरातील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारापासून दूरच आहे. सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्याशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, अजित दादा हे आमचे सर्वस्व आहेत. त्यांच्या बारामती मतदारसंघाचा विषय जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणतीही भूमिका घेता येणार नाही. आमदार राम सातपुते यांनी माझ्याशी संपर्क करून कार्यालयात भेटायला येणार असल्याचे सांगितले आहे. महायुतीच्या उमेदवाराबाबत आपली कोणतीही अडचण नाही सर्वांना मिळूनच भविष्यात काम करायचे आहे.