राजन पाटलांच्या भाजप प्रवेशावर मामा स्पष्टच बोलले ; दत्तात्रय भरणे गेला तरी पक्षाला फरक पडत नाही ; स्वबळाची तयारी ठेवण्याव्या सूचना
सोलापूर : दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी राष्ट्रवादी पक्षाला फरक पडत नाही. पक्षाची दुसरी यंत्रणा तयार असते असे सांगत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे स्पष्टच बोलण्याचे दिसून आले. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी युती करण्यासाठी महायुतीची तयारी आहे परंतु ऐनवेळी युती फिस्कटली तर स्वबळाची तयारी ठेवा अशा सूचनाही भरणे यांनी सोलापुरात घेतलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या.
माजी आमदार संजय शिंदे यांच्या निमगाव येथील फार्म हाऊसवर ग्रामीणची बैठक घेतल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीला शहराचे अध्यक्ष संतोष पवार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश नेते आनंद चंदनशिवे किसन जाधव नव्याने प्रवेश केलेले चंद्रकांत दायमा, माजी नगरसेवक तौफीक शेख, युवा नेते नजीब शेख, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, इरफान शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यांनी आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतल्याचे सांगत सर्वांनी एकत्रित येऊन निवडणुकीचे नियोजन करावे राज्यातील तीन पक्षाचे सरकार हे या निवडणुकीत महायुतीतून लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे परंतु ऐनवेळी जर युती न झाली तर 102 जागेवर आपण तयारी ठेवावी अशा सूचना केल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेत चार माजी आमदार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर भरणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यातल्या त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारले गेले. तेव्हा भरणे यांनी दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडत नाही. पक्षाची दुसरी यंत्रणा तयार असते असे सांगत अजून तरी कोणी पक्ष सोडून गेलेला नाही, त्यांचा दादांवर आणि दादांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा जर गैरसमज झाला असेल तर तो दूर केला जाईल. भविष्यात पक्षांमध्ये अनेक प्रवेश होणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष एक संघ आहे आणि राहणार असा दावा त्यांनी केला.