“संतोष भाऊ कुल डाऊन” तुमचा स्वभाव असा नाही ; शहरात चर्चेला उधाण
सोलापूर : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. दौरा तटकरेंचा अन् गाजल्या तक्रारी असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
सोलापूर शहरात शहराचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा एक गट तर जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील यांचा दुसरा गट तयार झाला आहे. उमेश पाटलांच्या शहरात होत असलेला हस्तक्षेप पाहता अनगरकर पाटलांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे हे दोन्ही नेते मात्र दोन्हीकडे हात ठेवून सावध भूमिकेत पाहायला मिळतात. तटकरेंच्या स्वागत जाहिरातीमध्ये जाणीवपूर्वक उमेश पाटील यांना स्थान देण्यात आले नव्हते. उमेश पाटील समर्थक कार्यकर्ते मात्र आवर्जून दिसून आले.
मेळाव्यामध्ये अध्यक्ष संतोष पवार यांनी खरे तर आपण अध्यक्ष काळात शहरात काय केले, संघटन आणि पक्ष वाढीसाठी काय उपक्रम राबविले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी पक्षाने कशी केली आहे, स्वबळाची तयारी सुद्धा केल्याचा दावा त्यांनी करायला हवा होता. शांत, संयमी आणि मितभाषी असणारे संतोष भाऊ बोलताना नाराज तर दिसून आलेच पण त्यांनी जिल्हाध्यक्षांवर आपल्या भाषणात राग बोलून दाखवला. एक तर अध्यक्ष पद त्यांना सर्वांना भांडून घ्यावे लागले आहे. त्यासाठी बरेच कष्ट आणि प्रयत्न त्यांचे आहेत. महापालिका निवडणुका या शहराध्यक्ष भाऊंच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.
या दौऱ्यानंतर संतोष भाऊंना असे भाषण करताना कधीच पाहिले नाही, भाऊ कुल डाऊन, तुमचा स्वभाव असा नाही अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.





















