सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील आणि बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांनी निष्ठावंत सध्या शांत आहेत अशी प्रतिक्रिया देत नाराजी तर व्यक्त केलीच मात्र चर्चेला तोंड फोडले होते, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी सध्या चर्चेचा विषय आहे, माजी आमदार राजन पाटील, मोहोळ आमदार यशवंत तात्या माने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचाच एक स्वतंत्र गट दिसून येतो.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर पदाधिकारी मेळावा, व एमआयएम पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम होता, या कार्यक्रमाचे पोस्टर जेव्हा सोशल मीडियावर वायरल झाले तेव्हा त्या पोस्टमध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा फोटो नव्हता हे जेव्हा मोहोळ तालुक्यातील मालकांच्या कार्यकर्त्यांना समजले तेव्हा त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे नियोजन केले, याची कुणकुण जेव्हा कार्यक्रमाच्या संयोजकांना लागली तेव्हा कार्यक्रमाच्या संयोजकांनी राजन पाटील यांच्या फोटोचे स्टिकर त्या बॅनरवर चिकटवले.
शनिवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागताला माजी आमदार राजन पाटील मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांनी शासकीय विश्रामगृहावर येऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर हे दोन नेते नंतर दिसले नाहीत. जिल्हाध्यक्ष काका साठे हे पाटबंधारे विभागाच्या बैठकीला उपस्थित होते मात्र शहर कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दमदार अजित दादा पवार या गाण्याच्या लॉन्चिंग वेळी ते गैरहजर राहिले. यावरून काकांचे राजन मालकांवरील प्रेम दिसून आले. हे चित्र पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट होते.
नंतर काही नाराज कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा मॅसेज व्हायरल केला तो पहा काय होता…
सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीची अवस्था सध्या मुर्गा करे मेहनत और अंडा खाए फकीर काहीशी अशीच झाली आहे.. लोकसभा असो अथवा विधानसभा असो प्रत्येक निवडणुकीत घरचाच चहा पाणी आणि नाश्ता घेऊन पक्षाचा झेंडा गाडीला बांधून उन्हात अहोरात्र प्रचार करून पक्षाचा उमेदवार विजयी करणार्या अनेक निष्ठावंत नेत्यांचा दिवसेंदिवस पक्षाला विसर पडत आहे मात्र चमकोगिरी करणाऱ्या आणि दस का बीस राजकीय डावपेच करत जिल्ह्याची राष्ट्रवादी म्हणजे आम्हीच आहोत असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीतील काही गटबाजी करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित नेत्यांमुळे येत्या काळात विकासाच्या वाटेवर असलेल्या पक्षाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.. अशा स्वरूपातील नाराजी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत..


















