मोहिते पाटील परिवार लंचसाठी सुशीलकुमार शिंदेंच्या जनवात्सल्य वर; राजकीय खलबते ; सुशील कुमारांनी देवेंद्र फडणवीसांना टोला
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी दुपारी आपल्या संपूर्ण परिवारासह उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर मोहिते पाटील संपूर्ण कुटुंबीय शेजारीच असलेल्या काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी दुपारच्या जेवणाला गेले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी नंदिनी देवी मोहिते पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, त्यांच्या पत्नी शितलदेवी मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, राजसिंह मोहिते पाटील, अर्जुन सिंह मोहिते पाटील, स्वरूपा राणी मोहिते पाटील, वैष्णवी मोहिते पाटील, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, संभाजीराजे शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या सर्वांचे आदरातिथ्य केले.
सुशील कुमार शिंदे यांनी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बराच वेळ या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
सुशीलकुमार शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, विजय दादा यांनी माढा भागात अतिशय चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे, तो भाग त्यांनी सांभाळून ठेवला आहे, त्यामुळे मला कोणतेही शंका नाही धैर्यशील मोहिते पाटील हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग आहे पन्नास वर्षांपूर्वी सोलापूरला केवळ एक उजनी धरण आहे, त्याचे पाणी जिल्ह्याला पुरत नाही, सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही ज्या ठिकाणी एक पेक्षा अधिक धरण आहेत हे बहुतेक फडणवीस विसरले असतील या शब्दात त्यांनी टोला हाणला.