सचिन कल्याणशेट्टी व आनंद तानवडे यांच्यात दिलजमाई ; या नेत्यांची मध्यस्थी
अक्कलकोट : विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत एकमेकांचे कट्टर विरोधक ही एकत्र येत आहेत. एकाच पक्षात असून दुखावलेली म्हणे जुळत आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. विद्यमान आमदार तथा अक्कलकोट भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे यांच्यात दिलजमाई झाली आहे.
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोबत राहिलेले माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातो.
परंतु दुसरीकडे एकाच पक्षातील तानवडे कल्याणशेट्टी या दोन नेत्यांमध्ये असलेले तात्विक मतभेद विसरून हे दोन्ही नेते आता एकत्र येत आहेत. यासाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील आणि सिध्देश्वर कल्याणशेट्टी यांनी पुढाकार घेतला. या तिघांमध्ये बैठक झाली.
आज मंगळवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस असून त्या दिवसापासून तानवडे हे त्यांच्या प्रचारार्थ सक्रिय होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली. याप्रकरणी आपले नेते आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत सुद्धा बोलणे झाले आहे असे तानवडे यांनी सांगितले. तानवडे सोबत आल्याने कल्याणशेट्टी यांना निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.