सोलापूर : राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन वाढीसाठी पोलीस पाटील संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष विजय मुकुंद वाघमारे यांनी मंगळवारपासून सोलापुरात आमरण उपोषण सुरू केले होते. त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम / जीएनएम / एलएचव्ही / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / औषध निर्माण अधिकारी / वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचान्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत
सेवेत कायम करणे व रिक्त पदावर समायोजन करणे यासाठी उपोषण सुरू केले आहे परंतु या आंदोलनाची अजूनही दखल घेतली गेली नाही.
दरम्यान गुरुवारी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या दोन्ही आमदारांनी उपोषणस्थळी भेट दिली. दोन्ही आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पोलीस पाटलांच्या मागणी संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमदार राऊत यांनी फोन लावला.
यावेळी दोन्ही आमदारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निश्चितच मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर विजय वाघमारे यांचे आंदोलन यावेळी मागे घेण्यात आले. दरम्यान कंत्राटी नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत हा विषय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात निश्चित मांडू असे आश्वासन आमदारांनी दिले.