महेश कोठे भेटले पोलीस आयुक्तांना ; भाजपच्या 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर : जुना विडी घरकुल भागात रस्त्याच्या उद्घाटनावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या श्रेयवादानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात माजी महापौर महेश कोठे, त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी महेश कोठे यांनी माध्यमांशी बोलताना आपण पोलीस आयुक्तांना भेटून आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही अशी तक्रार करणार आहोत अशी माहिती दिली होती.
दरम्यान महेश कोठे यांनी पोलीस आयुक्त राजकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर विडी घरकुल भागातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महेश कोठे भेटल्याची माहिती स्वतः पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.
विठ्ठल कोटा यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर शिवानंद पाटील, सतीश भरमशेट्टी, सुशांत भरमशेट्टी, अंबादास म्हता, राजकुमार हंचाटे, राजु हिबारे, राजेश मासम यांच्यावर भादवि ३२४.३२३,५०६,१०९,१४१,१४३,१४७ प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि ०९/०३/२०२४ रोजी ११.३० वा चे सुमारास जुना विडी घरकुल येथे वैष्णव मारुती चौक सोलापूर येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनच्या कारणावरून शिवानंद पाटील याने चिथावणी दिल्याने आरोपी क्र २ व ३ यांनी फिर्यादीस हाताने व लाथाबुक्यांने मारहाण करून रस्त्यावरील दगडाने मारहाण करून जखमी केले व दत्तात्रय जावळे सर हे सोडवा सोडवी करीत असताना त्यांना तु मध्ये येऊ नको नाहीतर तुला पण सोडणार नाही म्हणून दमदाटी केली तसेच वरील सर्व आरोपीतांनी फिर्यादीस दमदाटी केली आहे.