सोलापूर उत्तर मध्ये प्रचार रंगला, शहर मध्य मध्ये उमेदवार सावध तर दक्षिण मध्ये ‘आपलं, आपलं बरं चाललंय’
लोकसभा निवडणूक ही हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर चर्चेत राहिली. त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला देशात बसला. मुस्लिम समाज, मराठा समाज, आंबेडकरी समाज यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणे पसंत केले. हाच धोका ओळखून सध्या भाजप सावध भूमिका घेत आहे.
सोलापूर शहरातील तीन मतदारसंघांमध्ये शहर मध्य या मतदारसंघात हिंदुत्ववादावर इलेक्शन होईल अशी जोरदार चर्चा सुरुवातीला ऐकण्यास मिळाली परंतु तसे झाले नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी एका सभेमध्ये हिंदूत्ववादावर बोलताना मुस्लिम समाजाला लक्ष केले होते त्यामुळे समाजाने मोठ्या इरशीने मतदान करून भाजपला सडेतोड उत्तर दिले. पण मुळात कोठे हे काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. त्यांचा संपर्क मुस्लिम समाजासह सर्वांशीच आहे. त्यामुळे कोठे हे सुद्धा यावेळी आपल्या प्रचारात हिंदुत्ववाद समोर आणत नसून त्यांनीही प्रचारात सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते.
काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांना हिंदुत्ववादाचे काही घेणे देणे नाही, सर्वधर्म समभाव हाच त्यांचा मुख्य मुद्दा असून त्यांनी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या मतदानावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
एमआयएम हा पक्ष मुस्लिम समाजाचे प्रश्न, मुद्दे मोठ्या पोट तिडकीने आणि आक्रमकपणे मांडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु यंदा फारूक शाब्दि यांनी सुद्धा समाजातील आक्रमकपणा प्रचारात आणला नाही. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेची मागणी होती पण त्यांनी त्यास नकार देत त्यांचे मोठे बंधू आणि संविधानाला पकडून चालणारे असदुद्दीन ओवेसी यांची सभा घेतली. शाब्दि हे आपल्या प्रचारात हिरव्या झेंड्यांसह निळे, भगवे झेंडे घेऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.
दक्षिण सोलापूर मध्ये मात्र कोणीही एकमेकांवर टीका करताना दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रचारात दंग असून आपणाला मतदान कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे सुभाष देशमुख हे मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. तेच मुद्दे प्राधान्याने ते मांडत आहेत. धर्मराज काडादी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा मुद्दा पुढे करत प्रचार सुरू ठेवला आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष लिंगायत, धनगर, मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजावर पाहायला मिळते. महाविकास आघाडीचे अमर पाटील यांना युवकांचा मोठा पाठिंबा असून शिवसेनेला मानणाऱ्या मतांवर त्यांनी जोर दिला आहे.
शहर उत्तर मध्ये मात्र प्रचारामध्ये रंगत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक विरोधक महेश कोठे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. इथे मालक आणि चालक या शब्दावर प्रचार रंगला आहे. विजय देशमुख यांनी मागील वीस वर्षात किती विकास केला असे प्रश्न कोठे उपस्थित करत आहेत पण मागील 35 वर्षे महापालिकेत सत्ता भोगलेले महेश कोठे यांनी महापालिका लुबाडून खाल्ली असा प्रचार भाजपकडून होत आहे.