सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ; महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
सोलापूर : महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करत तिच्यासह तिची सासू व पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विशाल रामचंद्र गायकवाड (राहणार म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर) याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित फिर्यादी महिला ही विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. फिर्यादी मध्ये त्या महिलेने म्हटले आहे की,जुलै 2025 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान विशाल गायकवाड हा फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन मी तुम्हाला सारखे पाहतो, तुम्ही खुप सुंदर दिसता, तुमचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे, मी माझ्या ओळखीचे लोकांना तुमच्याकडे पाठवितो, मला तुम्हाला बोलावसे वाटते असे म्हणत होता.
त्यानंतर माझ्यावर लक्ष ठेवून, येता-जाता मला बोलून माझ्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अधून मधून मला भेटून मी नेता आहे, माझी दहशत ह्या भागात आहे, तुम्हाला काही अडचण असल्यास मला सांगा असे म्हणून तो मला सतत त्रास दिला, नंतर तो कायम माझ्या मोबाईल वर कॉल करून त्रास देऊ लागला. पण 21 नोव्हेंबर 2025 रोजी मात्र गायकवाड याने दुपारच्या सुमारास येऊन माझ्या अंगाशी झोंबाझोंबी केली, मी आरडाओरडा केला असता माझी सासू आली तिला पण धमकी दिली नंतर माझे पती आले असता त्यांनाही कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या महिलेने विशाल गायकवाड विरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात BNS 74,76,78,351(2) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.




















