सोलापुरात शरद पवारांची ‘तुतारी वाजली’ केवळ ‘शहर उत्तर’मध्येच ; सुधीर खरटमल यांच्याकडून महेश कोठे यांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचे चिन्ह घड्याळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाले. त्यानंतर पक्षाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव मिळाले आणि पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले. शरद पवार यांनी तुतारी हे चिन्ह थेट शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड वर अनावरण केले.
त्यानंतर सोलापूर शहरात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष यु एन बेरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूर शहरात तुतारी हे चिन्ह माहिती व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदयात्रा महात्मा बसवेश्वर चौकातून सुरू झाली ती माणिक चौक मार्गे, दत्त चौक, नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला. या मार्गावरून तुतारी वाजवण्यात आली.
या पदयात्रेत शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, कार्याध्यक्ष तौफिक शेख, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, सरफराज शेख, महीला आघाडीच्या सुनीता रोटे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली पदयात्रेचा हा मार्ग विशेषतः सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील आहे. त्यामुळे तुतारी हे चिन्ह केवळ सोलापूर शहर उत्तर मधीलच नागरिकांना माहिती होण्यासाठी होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.