सोलापुरात पोलिसांचा जोरदार प्रहार ; अजित कुलकर्णी दोन वर्षासाठी तडीपार
सोलापूर : पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार करताना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी असे त्यांचे नाव आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार इसम नामे, अजित प्रभाकर कुलकर्णी, वय-४८ वर्षे, रा. विजय देशमुख नगर, विजापूर नाका, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८, २०२०, २०२१, २०२२ व २०२४ या कालावधीमध्ये साथीदारांसह खंडणी मागणे, दंगा व मारामारी करणे, सरकारी नोकर काम करत असताना त्यांना दमदाटी करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ३१३९/२०२४ दि.०९/१२/२०२४ अन्वये, इसम नामे, अजित प्रभाकर कुलकर्णी, वय-४८ वर्षे, रा. विजय देशमुख नगर, विजापूर नाका, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.