अय्यो ! काँग्रेस एवढ्याच एमआयएमच्या जागा विजयी ; सोलापुरात आगळावेगळा जल्लोष
सोलापूर — बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयानंतर सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारूक शाब्दि यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि विजयी आनंद जल्लोषात साजरा केला.
सोलापूर शहरातील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोस्तव साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना फुले उधळून शुभेच्छा दिल्या. एकमेकांना मिठाई खाऊ घालत आनंद साजरा केला.
बिहारमधील ऐतिहासिक निकाल हा पक्षाच्या विचारधारेवर लोकांच्या पडलेल्या विश्वासाचे प्रतीक असून या विजयामुळे महाराष्ट्रातही नवीन उर्जा निर्माण झाली आहे. “हा विजय लोकांच्या आशा-अपेक्षांचा आणि बदलाच्या इच्छेचा परिपाक आहे,” असे फारूक शाब्दि यांनी सांगितले.
पक्षाच्या वतीने सोलापूरात विजय महोत्सवाचे विशेष आयोजन केले होते. यात अनेक तरुणांनी उपस्थित राहून देशभरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत शांतता आणि सुव्यवस्था राखली.
विजयानंतर फारूक शाब्दि यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “बिहारमधील हा ऐतिहासिक विजय हा जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला असून सोलापूरसह देशभरातील कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हा उत्साह दुणावला आहे.”
सोलापूरातील या विजय जल्लोषामुळे संपूर्ण शहरात निवडणूक विजयानिमित्त आनंदाची लहर उमटलेली पाहायला मिळाली.


















