अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जून्यानी नव्यांना दाबले ! चंदनशिवे दुखावले, आंबेडकरी कार्यकर्ते नाराज झाले
सोलापूर : महायुतीच्या सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिलाच सोलापूर शहराचा दौरा केला. भरगच्च असे कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले पण हा दौरा गाजला तो पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीमुळे. या दौऱ्यामध्ये जुने जेष्ठ कार्यकर्ते विरुद्ध अजित पवारांना मानणारे नवे कार्यकर्ते अशी उघड गटबाजी पाहायला मिळाली. एकूणच जुन्या नेत्यांनी नव्याना चांगलेच दाबल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
सोलापुरात अजित पवारांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे. त्यामध्ये आमदार संजय मामा शिंदे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे दादाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे सत्तेत गेल्यानंतर काही ज्येष्ठ मंडळींनी दादा गटात जाणे पसंत केले. हे इकडे कसे म्हणून तेव्हा अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं होतं.
शनिवारच्या दादांच्या दौऱ्यात उमेश पाटील, संतोष पवार, जुबेर बागवान यांचा एक स्वतंत्र गट दिसून आला तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने आणि यांच्या गोटात सहभागी झालेले किसन जाधव असा वेगळा गट पाहायला मिळाला. दीपक साळुंखे पाटील यांनी जिल्ह्याचे कार्यालय काढले आहे. त्यांच्या सर्व जाहिराती या किसन जाधव यांच्याकडून माध्यमांना मिळाल्या. जाहिराती देताना आबांचे स्वीय सहाय्यक तिथे ठाण मांडून होते. किसन जाधव यांच्या जाहिरातीत उमेश पाटलांना जाणीवपूर्वक डावल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे शहराच्या मेळाव्याच्या पोस्टर मध्ये किसन जाधव यांचा फोटोही नसल्याचे पाहायला मिळाले.
शहराच्या मेळाव्यात स्वतः पवारांनी संतोष पवार, झुबेर बागवान, किसन जाधव यांना एकत्रित समन्वय ठेवून पक्ष वाढवण्याची चांगलीच तंबी दिली. शहराच्या पदाधिकाऱ्यांनी एवढे मोठे प्रवेश घडवून आणले त्याचे कौतुक न करता उलट दादांनी भर मेळाव्यात सुनावले. दादांना याबाबत पद्धतशीरपणे सांगण्यात आले होते का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
रात्रीच्या सुमारास बहुजन समाज पक्षाचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानी अजित पवारांच्या स्वागताची अतिशय जय्यत तयारी केली होती. हजारो कार्यकर्ते यावेळी दादांच्या स्वागताला त्या ठिकाणी आल्याचे समजले.
जेव्हा अजित पवार मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट द्यायला गेले त्यानंतर ते चंदनशिवे यांच्या घराकडे जातील अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांची गाडी थेट दिलीप माने यांच्या फार्म हाऊसकडे वळविण्यात आली. दादा इकडे न येता तिकडे गेल्याने शहराचे प्रमुख पदाधिकारी नाराज झाले ते मागे पळत पळत दादांच्या मागे गेले. तिथं विनवणी करण्यात आली. चिडलेल्या दादांनी पदाधिकाऱ्यांना चांगले सुनावले. दादांना जाण्यासाठी अनेकांनी विनंती केली परंतु ते कुणाचही ऐकले नाहीत शेवटी ते बारामतीला निघून गेले.
आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे म्हणून उमेश पाटील, संतोष पवार यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश मिळाले. यापूर्वी आनंद चंदनशिवे हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांचा महानगरपालिकेतील आलेख वाढत गेलेला दिसून येतो. त्यामुळे आंबेडकरी समाजातील मोठा कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये येत असल्याने पदाधिकारी आनंदित होते. परंतु या गटबाजीमुळे चंदनशिवे यांना फटका बसला. दादांना न आल्याने चंदनशिवेंच्या आनंदावर विरजण पडले. त्याठिकाणी आलेले हजारो आंबेडकरी कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.