दक्षिणच्या या बड्या नेत्यांवर कारवाई करण्याची डेरिंग नाना पटोले करणार का?
सोलापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. त्याला सोलापूर जिल्हा ही अपवाद नाही. सोलापुरात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ व मंगळवेढा पंढरपूर मतदार संघ या ठिकाणी आघाडी एकमेकांविरोधात लढत आहे.
त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रक काढून कार्यकर्त्यां विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे की, आपण महाविकास आघाडीतील उमेदवारांचा प्रचार प्रसार करावा पण कोणत्याही अपक्ष व इतर उमेदवाराचा प्रचार केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
सध्या सोशल मीडियावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे हे पत्र वायरल होत आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अमर पाटील हे उमेदवार असताना त्यांच्या विरोधात धर्मराज काडादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दक्षिण मधील लिंगायत समाजासह इतर समाजाचे सर्वच नेते त्यांच्या बाजूने एकत्र आले आहेत.
काडादी उमेदवार असल्याने काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, माजी झेडपी सदस्य संजय गायकवाड, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते थेट प्रचारात सहभागी झाले आहेत.
प्रदेशाध्यक्षांनी काढलेल्या पत्रानंतर आता नाना पटोले हे हसापुरे, शेळके, जमादार, पाटील, गायकवाड अशा काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर कारवाई करण्याची डेरिंग करणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे.