“भाई घर वापसी होगी क्या” ; बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम ; थेट या यादीत दिसले नाव
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग रचना ही 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणे राहिली असल्याने विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच सभागृहात पुन्हा जाण्याचे स्वप्न पडू लागले आहे.
सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएम आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी 26 प्रभागात निरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये एका प्रभागात दोन ते तीन कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे दिसून येते.
विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस पक्ष सोडलेले ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांच्या नावाचा या यादीत समावेश असल्याने अनेक नेत्यांनी अजब व्यक्त केले आहे. शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी तयार केलेल्या यादीत प्रभाग क्रमांक वीस मध्ये बाबा मिस्त्री यांचे नाव निरीक्षक म्हणून आहे. त्यामुळे बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम आहे हे दिसून येते.
पक्षावर आणि नेत्यांवर नाराजी व्यक्त करत मिस्त्री यांनी काँग्रेस सोडली होती. त्यांनी प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवली. आता ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे असे असताना काँग्रेसच्या यादीत नाव आल्याने बाबा घर वापसी करणार का अशीही चर्चा आता रंगली आहे. एकूणच राजकीय समीकरणे पाहता काँग्रेसला आणि बाबा मिस्त्री यांना एकमेकांशिवाय पर्याय नाही असे ही बोलले जात आहे.
