‘दिलीप माने की धर्मराज काडादी’ दक्षिणचा आज निर्णय ; शहर मध्य बाबा मिस्त्री फिक्स?
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीची घोषणा रविवारी झाली आता महाविकास आघाडी कडून काँग्रेस तर्फे उमेदवार कोण अशी एकच चर्चा असून दिलीप माने की धर्मराज काडादी या दोन नेत्यांपैकी एकाच्या नावाची घोषणा सोमवारी रात्री होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शहर मध्ये या मतदारसंघातून मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे विरोधात प्रणिता शिंदे यांच्या प्रचारार्थ सक्रिय सहभाग नोंदवणारे धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक झाले आहेत. त्यांनी गाव भेट दौरे ही केले आहेत. जरी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मागितली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे त्यांनी दक्षिण साठी उमेदवारी मागितली. धर्मराज काडादी यांना उभा करण्यासाठी स्वतः शरद पवार इच्छुक आहेत. ज्या पक्षाला दक्षिणची जागा जाईल त्या पक्षाकडून काडादी यांना उभे करण्यात येणार आहे.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार दिलीप माने यांनी ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रणिती यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी ही आपली सर्व ताकद लावली. त्यामुळे त्यांनीही या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मुळात दक्षिण मध्ये प्रत्येक गावातील माने यांचे कार्यकर्ते असून शहरी भागात त्यांची बांधणी चांगली आहे. त्यामुळे आता दिलीप माने की काडादी याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्ष शहर मध्य या मतदारसंघासाठी सर्वसमावेशक चेहरा देण्याचा तयारीत आहे. तो चेहरा म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, कोविड काळात अनेकांच्या मदतीला धावून जाणारे, रुग्णसेवक काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री यांचा.
सध्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मुस्लिम मतदार असल्याने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी जोर लावला आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत आणि या कार्यकर्त्यांनी जर बाबा मिस्त्री उमेदवार म्हणून आले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असेही पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देऊन काँग्रेस एका दगडात अनेक पक्षी मारेल यात शंका नाही पण बाबा मिस्त्री हे 2019 ला दक्षिण विधानसभा लढवल्याने त्यांची इच्छा दक्षिणमधून उभारण्याची आहे. आता पक्ष काय निर्णय घेतोय याकडे बाबा मिस्त्री समर्थक तसेच मुस्लिम समाजाचे लक्ष लागले आहे.