












काँग्रेसचा फिरदोस पटेल यांना प्रश्न ; तुमच्या घरात दोन…, एमआयएमचे…..; दोन दिवसात काँग्रेसच्या 275 इच्छुकांच्या उत्स्फूर्त मुलाखती
सोलापूर | सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेचा आज दुसरा दिवस यशस्वीरीत्या पार पडला. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन, सोलापूर येथे दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय प्रक्रियेत शहरातील विविध प्रभागांमधून एकूण २७५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखतीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह उपस्थित नेतेमंडळींनी इच्छुक उमेदवारांशी सविस्तर संवाद साधला. जनसेवा, विकास आणि पारदर्शक प्रशासन या काँग्रेसच्या मूलभूत मूल्यांवर आधारित सक्षम, विश्वासार्ह व विकासाभिमुख उमेदवार निवडण्याच्या दिशेने पक्ष ठामपणे पुढे जात असल्याचे या प्रक्रियेतून स्पष्ट झाले.
या दोन दिवसांच्या मुलाखतींसाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी काँग्रेस भवन परिसरात उसळली होती. ढोल-ताशे, हलग्यांच्या कडकडाटात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उत्साहात मुलाखतीसाठी दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी शहरातील उर्वरित प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरीत्या पार पडल्या.
पूर्वीचे काँग्रेस नेते शौकत पठाण हे एमआयएम पक्षात आहेत, त्यांनी इच्छुकांचे अर्ज मागून घेतले आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग नगरसेविका फिरदोस पटेल या मुलाखत द्यायला आल्यानंतर त्यांना शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रश्न विचारले तुमच्या घरात दोन पक्ष आहेत एम आय एम चे काय? ठोस निर्णय घ्या, आम्हाला सांगा. यावेळी फिरदोस पटेल यांनी मी काँग्रेसमध्येच आहे. यापूर्वीही सांगितले आहे काँग्रेस सोडणार नाही.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच निरीक्षक मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय मुलाखत प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ही निवडणूक सत्तेसाठी नव्हे, तर सोलापूरकरांच्या हक्कांसाठी आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन भाजपच्या अपयशी कारभाराला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. सोलापूरमध्ये परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस हा कार्यकर्त्यांवर उभारलेला पक्ष असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
दरम्यान, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरोटे यांनी सांगितले की, या मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांची सामाजिक बांधिलकी, स्थानिक प्रश्नांची जाण, जनसंपर्क, संघटनात्मक अनुभव तसेच आपल्या प्रभागात राबवू इच्छिणाऱ्या विकासात्मक संकल्पना यांचा सखोल आढावा घेण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येणारा नगरसेवक हा जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिनिधित्व करणारा असावा, या भूमिकेतूनच ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, यावेळी पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून काँग्रेस अधिक ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.”
या मुलाखतींसाठी खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, प्रवक्ते वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश चिटणीस श्रीशैल रणधिरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष नागनाथ कदम, ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, हेमाताई चिंचोलकर, अंबादास गुत्तीकोंडा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.





















