अतिसंवेदनशील जिल्ह्याला शांततेची झालर ; निवडणूक आयोगाकडून सन्मान ; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची यशस्वी वर्षपूर्ती
नवनवीन संकल्पना आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिल्पकार म्हणून ज्यांची सोलापुरात ओळख तयार झाली ते छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या प्रशासकीय कारकीर्दीला 15 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल अडीच वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा यशस्वीपणे पदभार पाहिल्यानंतर त्यांची बदली झाली परंतु त्यांना काही महिने वेटिंग वर ठेवण्यात आले. शासनाने त्यांच्यासाठी चांगला जिल्हा आणि जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्याचे ठरवल्याने 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना विभागीय जिल्हा असलेला छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती दिली. तो दिवस त्यांच्या कायमच आठवणीत राहणारा असेल. कारण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पदभार घेतला.

पदभार घेतल्यानंतर एका महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या 2024 ची लोकसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली. मराठा आरक्षणाचा विषय, मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा विषय, संविधान विषयी निर्माण झालेले वेगवेगळे मुद्दे यामुळे महाराष्ट्रात ही निवडणूक गाजली आणि त्यातच छत्रपती संभाजी नगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा अति संवेदनशील मानला जातो. सर्वाधिक मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदान असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष तिकडे लागले होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिशय योग्य प्रकारे नियोजन केले अतिशय शांततेत कोणताही वाद न होता ही निवडणूक पार पडली. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी हाताळली. ती निवडणूक सुद्धा शांततेत पार पडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल औरंगाबादचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या दोन्ही अधिकाऱ्यांचा निवडणूक आयोगाने विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला.
पूर्वीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आताचे खासदार संदिपान भुमरे आणि आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी समन्वय राखून छत्रपती संभाजी नगरच्या विकासाचे व्हिजन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ठेवले आहे.
एक वर्षात राबवलेले विविध उपक्रम
गाव तिथे वड : प्रत्येक गावात पाच वड लागवड लोक सहभागातून लागवड केली.
पाणीटंचाईवर मात : उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई काळात ज्या गावात पाण्याचे टँकर लागलेले होते त्या गावात टँकर मुक्तीसाठी जलयुक्त गाव अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये गावातील विहीर बोअर याचे पुनर्भरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयावर वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्यात आले.
महिला सक्षमीकरण : महिला सक्षमीकरण अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. विविध उपक्रम राबविण्यात येऊन मुलीचा जन्म दर सुधारण्यात आला. महिला सुरक्षितता यावर लक्ष शाळेत CCTV बसविण्यावर भर दिला.
दशसुत्री शिक्षण :
शिक्षण विभागात नवीन कार्यक्रम देऊन त्या मध्ये आरोग्य, संस्कार, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा तयारी यावर भर देण्यात आला. महाविद्यालयात युवा संवाद व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आल्या.
प्रत्येक तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची उभारणी करून महिलांना सुविधा व सुरक्षितता पुरवण्यात आल्या.
कर्मचारी अधिकारी यांचे करता विविध प्रशिक्षण, कार्यशाळा
लाडकी बहीण योजना मेळावा : महायुती सरकारचा अतिशय महत्त्वकांक्षी कार्यक्रमासलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील पहिला व शेवटचा कार्यक्रम छत्रपती संभाजी नगरला झाला.
संभाजी नगर पॅटर्न पूर्ण जिल्हा भर राबवला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
राज्य स्तरीय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगल्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्याबद्दल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून कौतुक झाले.
सैनिक कल्याण निधी संकलनातील उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांचे हस्ते २६ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.
फेरफार अदालत :
एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील मंडळ अधिकारी मुख्यालयात प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी विशेष अदालत आयोजित करून सहा हजार फेरफार निकाली काढले. ई ऑफीस राबवण्यावर भर देण्यात येत असून शेकडो नसती आता ऑनलाईन झाल्या आहेत.