अक्कलकोटच्या शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर ; दहावीचा गणित पेपर…? रिपाइं कार्यकर्ते आले झेडपीत
अक्कलकोटला रात्री पावणेनऊ वाजता गणिताचा पेपर कष्टडीला आणल्याचे प्रकरण गाजत असताना रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दहावीचा गणिताचा पेपर दुपारी एकला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कष्टडीला रात्री पावणेनऊला पोहोचविला गेला असून यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाइंचे आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी दहावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी 11 ते दुपारी एक असा पेपरचा कालावधी होता. पेपर संपल्यानंतर दोन ते अडीच तासात पेपर कस्टडीमध्ये पोहोचवणे अपेक्षित आहे. अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री पावणेनऊ वाजता रिक्षातून दहावीचे पेपर आणण्यात आले आहेत. या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती या प्रकरणात कोणतीही चौकशी अद्यापही न झाल्याने सोमवारी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट चौकशीची मागणी केली आहे.
आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, गोरखनाथ धाडेमनी, आदींची उपस्थिती होती