अजितदादा दिवसं फिरले ! उमेश पाटील व आनंद चंदनशिवे आज कुठे अन् त्यांची काय अवस्था
सोलापूर : एक वर्षांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊस वर मनसोक्त हुरड्याचा आनंद घेतला. पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेले आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जाणे टाळत मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहराचे अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे सर्वच प्रमुख नेते त्यावेळी तोंडघशी पडल्याचे पाहायला मिळाले.
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/02/IMG_20250213_151012.jpg)
त्या दौऱ्यात उमेश पाटलांचे विरोधक मानले जाणारे माजी आमदार राजन पाटील, मोहोळच्या आमदार यशवंत माने त्यावेळचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे पण सोबत होते त्यावेळी दादांच्या कानात अशी ब्रीफिंग केली की त्या ब्रीफिंगमुळे चंदनशिवे यांच्या निवासस्थानाकडे वळणाऱ्या गाड्या अचानक तिऱ्हेच्या मार्गाने टर्न झाल्या.
बरीच विनवणी केली मात्र दादांनी जाणे टाळले. त्यावेळी उमेश पाटील विरोधकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत मोहोळ उमेदवारीवरून उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन टाकला अजित पवारांनी त्यावेळी खालच्या पातळीवर जाऊन उमेश पाटील यांच्यावर टीका केली होती त्यामुळे नाराज झालेल्या उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. शरद पवार यांचा उमेदवार राजू खरे यांना निवडून आल्याने आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांचा थेट पराभव झाला.
राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात त्याचा प्रत्यय बरोबर एक वर्षानंतर पाहायला मिळाला.
आज पुन्हा राज्यात महायुतीची सत्ता आली अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उमेश पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश न करता पुन्हा दादांकडे जाणे पसंत केले शब्दाला पक्का असणारे दादा उमेश पाटील यांनी सुद्धा यशवंत माने यांचा पराभव करून दाखवतो दिलेला शब्द खरा करून दाखवला म्हणून तितक्याच प्रेमाने त्यांना जवळ घेतले.
आनंद चंदनशिवे यांनीही राष्ट्रवादीला न सोडता विधानसभा आणि लोकसभेमध्ये पक्षाचे उमेदवारांचा प्रचार करून सर्वांचे लक्ष वेधले. अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अधिकृतपणे राहत चंदनशिवे यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
त्यावेळचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी दादांना सोडून मशाल हाती घेऊन निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला. आता ते पुन्हा दादांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण आबांना दादा किती जवळ करतील हा मोठा प्रश्न आहे.
मोहोळमध्ये आमदार यशवंत माने यांचा पराभव झाल्याने नकळत राजन पाटील हे सुद्धा आता बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे मोहोळ मध्ये उमेश पाटील यांचे नेतृत्व बऱ्यापैकी युवा कार्यकर्ते मान्य करू लागल्याचे पाहायला मिळते.